तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक अमोल जाधव यांनी मुंबई येथील शिवसेना पक्ष कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती भेट देऊन उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
यावेळी तुळजापूर शहरातील यात्रा मैदानाच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशविदेशातून लाखो भक्त तुळजापूरमध्ये येतात. या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यात्रा मैदानावर आधुनिक व सुविधायुक्त पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अमोल जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला लवकरात लवकर योग्य नियोजन करून यात्रा मैदान येथे पार्किंग व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात आणि तुळजापूर शहरातील वाहतुकीचा भार कमी व्हावा, यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
याबाबत माहिती देताना अमोल जाधव यांनी सांगितले की, “तुळजाभवानी मातेच्या सेवेसाठी आणि यात्रेच्या नियोजनासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यात्रा मैदानाच्या विकासासाठी सकारात्मक आश्वासन दिले असून, लवकरच ठोस पावले उचलली जातील.“ या बैठकीमुळे तुळजापूर शहरातील यात्रा मैदानाच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. भाविकांना पार्किंगची उत्तम सुविधा मिळाल्यास मंदिर परिसरातील गर्दी कमी होऊन, वाहतुकीच्या समस्या सुटतील आणि यात्रेचा अनुभव अधिक सुखद होईल.