कळंब,(प्रतिनिधी) - येथील देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, निबंध ,चित्रकला इत्यादी स्पर्धा घेऊन दरवर्षी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येते. यावर्षी शिवजयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशवंत विद्यार्थ्यांना श्री हेमंत ढोकले तहसीलदार कळंब, प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. रमेश जाधवर ह भ प महादेव महाराज आडसूळ, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड दिलीपसिंह देशमुख, माजी नगराध्यक्ष यशवंत दशरथ,प्राचार्या लता यंदे , शिवसेना उबाठा गटाच्या शहरप्रमुख धनश्री कवडे या मान्यवरांच्या शुभहस्ते 74 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार हेमंत ढोकले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कार्याचा प्रेरणादायी इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. अभ्यासात कष्ट व सातत्य ठेवून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्याचे उत्तम उत्तम नागरिक बनाल अशी अपेक्षा विद्यार्थ्याकडून व्यक्त केली. गेल्या दहा वर्षापासून शिवजयंती निमित्त देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाचे कौतुक करत देशमुख प्रतिष्ठानचे कार्य हे समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात्रा, लता मंगेशकर विद्यालय कळंब, मॉडेल इंग्लिश स्कूल कळंब या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने या गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्री राजेंद्र बिक्कड, राजेंद्र पवार, महादेव खराटे ,ऋषी कुमार साबळे, गजानन पाटील ,वाघमारे सर सरोजिनी पोते, मनीषा पवार, लता यंदे या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक ॲड. दिलीपसिंह देशमुख ,सूत्रसंचालन प्रसिद्ध शिवव्याख्याते महादेव खराटे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे सदस्य श्री पांडुरंग गुरव श्री ॲड.पृथ्वीराज देशमुख ,मॉडल इंग्लिश स्कूलचे शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.