धाराशिव (प्रतिनिधी)- भारत देशातील सर्वात बलवान राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने राज्याच्या उज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण आज आपला अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला मजबूत करणारा अर्थसंकल्प असून राज्यातील सर्व घटकांना न्याय देत पायाभूत विकास कामांना गती देत राज्याला पुढे घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाबद्दल राज्यातील महायुती सरकारचे हार्दिक अभिनंदन भारतीय जनता पार्टीचे मा.जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे यांनी केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की या अर्थसंकल्पात महिला, युवक,बालके, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अन्न,सुरक्षा,निवारा, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, आणि रोजगार व स्वयंरोजगार इत्यादी योजनांच्या सक्षमीकरणासाठी बळ देण्याचे काम महायुती सरकारने या अर्थसंकल्पातून केले आहे. महिला सबलीकरणासाठी राज्यातील 24 लाख महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केले आहे.
राज्यातील सर्वात मोठा घटक हा सर्वसामान्य आहे.सर्वसामान्यांच्या निवाऱ्यासाठी 25 लाख नवीन घरांची तरतूद या अर्थसंकल्पात करून बेघरांना प्रचंड मोठा आधार व दिलासा दिला आहे. घरकुलाच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ देखील सरकारने केलीआहे. त्यांना हक्काच्या घराची सोय करून दिल्याबद्दल मी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभारी असून राज्यातील सर्वसामान्यांबद्दल असलेली तळमळ व प्रयत्नांची पराकाष्टा यातून दिसून येते. कोयना येथील जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता दिली असून सर्वसामान्य लोकांच्या रोजगार वाढीला हातभार या प्रकल्पातून लागणार आहे. दरवर्षी 3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिवस व 3 ते 9 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येईल. मराठी भाषेचे अभिजात विद्यापीठ व संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे केंद्र व अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. तसेच महापुरुषांच्या स्मारकासाठी ही या अर्थसंकल्पामध्ये विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महापुरुषांच्या शौर्याची यशोगाथा येणाऱ्या पिढीला यातून मिळेल.
शून्य ते शंभर युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना सौरऊर्जेसाठी अनुदान देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 36 हजार कोटी व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद महायुती सरकारने केली आहे. मराठवाड्याच्या प्रगतीसाठी गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे 37 हजार 668 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प आपले राज्य सरकार निर्माण करत आहे. एकूणच हा आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा अर्थसंकल्प आहे. असे मत श्री नितीन काळे यांनी बोलताना यावेळी व्यक्त केले.