धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा अकांक्षित जिल्हा आहे. या जिल्ह्यातील एकदर वातावरण मोठ्या प्रमाणात लाभदायक आहे. त्यामुळे जिल्ह्यात काम करताना कृषी, सौरउर्जा, पाणी, पर्यटन, आरोग्य यावर आपण प्रामुख्याने भर देणार असल्याची माहिती नूतन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवार दि. 11 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या उपस्थित होत्या. पुढे बोलताना किर्ती पुजार यांनी या जिल्ह्यात काम करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून काम करण्याचे नियोजन आहे. येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात दळणवळणाच्या सुविधा चांगल्या आहेत. त्यामुळे फळबाग लागवड, सौरउर्जा, पर्यटन आदीबाबत लवकरच कालबध्द कार्यक्रम आपण तयार करणार असल्याचेही जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले. जिल्ह्यात 150 पर्यटन स्थळ असून, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल. महिला बचत गटांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल असेही पुजार यांनी सांगितले.