उमरगा (प्रतिनिधी)-  भाजपा युवा नेते शरण बसवराज पाटील यांच्या पुढाकारातून उमरगा येथे घेण्यात आलेल्या विभागीय महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात लातूर व धाराशिव जिल्ह्यातील दहा हजार पाचशे विविध आजाराच्या रुग्णांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.

उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार दि. 4 मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार होते. धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, लातूर येथील प्रदीप राठी, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, राष्ट्रवादीचे प्रा. सुरेश बिराजदार, श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, सचिव रामकृष्णपंत खरोसेकर, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहशिलदार गोविंद येरमे, व्यकंट लामजणे, अभय चालुक्य, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, रोटरीचे अध्यक्ष संजय साळुंके जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. एल. हरिदास, अभय चालुक्य सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

या वेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा म्हणाले की, शरण पाटील यांनी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील व बापुराव पाटील यांच्या सामाजिक व राजकिय कार्याची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार यांचे अध्यक्षीय भाषण झाले. यावेळी लातूर येथील प्रदीप राठी यांचे भाषण झाले. प्रास्ताविक महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आयोजक शरण पाटील यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. उल्हास घुरघुरे व प्रा.डॉ. लक्ष्मण बिराजदार यांनी केले.प्रा .डॉ. श्रीराम पेठकर यांचे भाषण झाले. आभार प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी मानले.

 
Top