धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ताजमहल टॉकिजच्या बाजूला असलेल्या येमाई मंदिर शॉपिग कॉम्पलेक्सला 3 मार्चच्या पहाटे आग लागल्यामुळे पाच दुकाने जळून खाक होवून 35 लाखाचे नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. 3 मार्च रोजी पहाटे 5.30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान, ताजमहल टॉकीजच्या बाजूला असलेल्या येमाई मंदिर शॉपिंग कॉम्पलेक्सला आग लागून पाच दुकाने जळून खाक झाली. धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण असताना देखील अग्निशामन दलाची गाडी एक तास उशिरा आल्यामुळे अन्य दुकानांसह इतरांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्यामध्ये संतोषकुमार वतने, रणजित वैद्य, दत्तात्रय तेरकर, रावसाहेब गुंडरे, तानाजी सारफळे व या ठिकाणी दत्ता गवळी यांचे घर असल्या कारणाने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 



कर्मचारी नाहीत

धाराशिव नगर पालिकेकडे अग्निशामन दलाची गाडी नादुरूस्त आहे. त्याचप्रमाणे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. विशेष म्हणजे उमरगा नगर परिषदेचे अग्निशामन दलाची गाडी धाराशिव येथे काही कामानिमित्त आल्यामुळे उमरगा नगर परिषदेच्या अग्निशामन दलाने आग विझविण्याचे काम केले. अग्निशमन गाडीवर अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे ताजमहल टॉकीजचे मालक खॉनसाब यांचे सर्व नातेवाईक मोठ्या प्रमाणात मदतीला धावून आले. तर वाहतूक विभागाचे पीएसआय पंडित मुंडे व त्यांचे इतर सहकारी आगीचा लोळ दिसताच विझविण्यासाठी धावून आले. अग्निशमन दलाची गाडी एक तास उशिराने आल्यामुळे अजून काही दुकानांना आग लागण्याची शक्यता होती. परंतु खॉनसाब यांचे नातेवाईक व वाहतूक विभागाचे पीएसआय पंडित मुंडे यांनी मिळेल तेथून पाणी आणून टाकल्यामुळे पुढील अनर्थ टळला. 


अध्यक्षांची भेट

व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी बोलताना सांगितले की, धाराशिव नगरपरिषदेकडे जिल्ह्याचे ठिकाण असतानाही अग्निशमन दलाची गाडी नाही. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जळीत प्रकरणी तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असून, तलाठी यांनी पंचनामा केला आहे. आपत्कालीन व्यवस्थेमधून तहसील कार्यालयामार्फत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे. 


 
Top