तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील ड्रग्ज प्रकरणात मुंबई येथील संतोष खोत याला शुक्रवारी दि. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तुळजापूर शहरातून ताब्यात घेतले. त्याला 13 मार्चपर्यंत 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या 5 झाली असून, एकजण अद्याप फरार आहे.
मागील आठवड्यात 14 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील तामलवाडी येथून तुळजापूर शहरात विक्रीसाठी आणण्यातत येणारे अंमली पदार्थ एमडी ड्रग्जसह अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी (दोघे रा. तुळजापूर) व संदीप संजय राठोड (रा. नळदर्ग) यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी एमडी ड्रग्जया 59 पुड्या (2 लाख 50 हजार रूपये) व गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबईल असा एकूण 10 लाख 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यांना मुंबई येथील संगिता गोळे या महिलेने ड्रग्ज पुरवल्याची माहिती दिली होती. तामलवाडी पोलिसांनी दि. 22 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून संगिता गोळे या महिलेला ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी मुंबई येथील संतोष खोत याला तुळजापूर शहरातून ताब्यात घेण्यात आले. प्रकरणातील बडे मासे मोकाट असल्याने नागरिकांमध्ये पोलिस कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.