धाराशिव (प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय अंतर्गत येणाऱ्या मराठवाडा विभागातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा बक्षीस वितरण समारंभ रुपामाता परिवाराचे मॅनेजिंग डायरेक्टर अँड. अजित व्यंकटराव गुंड यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी भाई उद्धवराव पाटील यांचे नातू आदित्य पाटील, राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेता विजय ढगे, कॅप्टन इलेक्ट्रिकलचे अभिजीत मोरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे, खेळात देशातली पहिली डॉक्टरेट मिळवणारे डॉ. विलास जोंधळे, प्रेरणा युथ फाऊंडेशनचे नितीन खंडागळे, गणेश इंगळगी, मेघराज बागल, मुदस्सिर शेख, अशितोष नाईक, चेतन भद्रे, अविनाश खांडेकर हे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अँड. अजित व्यंकटराव गुंड म्हणाले की, 2003 साली स्थापन झालेला रुपामाता परिवार आज वटवृक्षात रूपांतरीत झालेला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही समाजातल्या सर्व क्षेत्रातील बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आयटीआय सक्षम केले पाहिजे. त्यांचे आधुनिकरण केले पाहिजे.
लातूरकरांचे वर्चश्व
यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंना बक्षीस वाटप करण्यात आले. मुलांच्या खेळात क्रिकेटमध्ये विजेता लातूर, उपविजेता छत्रपती संभाजी नगर, खो-खो मध्ये विजेता लातूर, उपविजेता छत्रपती संभाजी नगर, हॉलीबॉल मध्ये विजेता लातूर, उपविजेता धाराशिव यांनी पारितोषिक पटकावले.
मुलींच्या सांघिक खेळात क्रिकेट मध्ये विजेता लातूर, उपविजेता जालना, हॉलीबॉल विजेता लातूर, उपविजेता धाराशिव, खो-खो विजेता जालना, उपविजेता बीड, हॉलीबॉल विजेता बीड, उपविजेता धाराशिव यांनी पारितोषिके पटकावली. यांना सांघिक खेळासाठी ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत 100 व 200 मीटर धावणे आर्यन गायकवाड छत्रपती संभाजी नगर, कॅरम मध्ये दखनी जाहेब धाराशिव, बुद्धिबळ मध्ये सुदर्शन देवगिरी धाराशिव तर मुलींच्या वैयक्तिक स्पर्धेत 100 व 200 मीटर धावणे तृप्ती जाधव, कॅरम मध्ये काजल कुरील हिंगोली, बुद्धिबळ मध्ये हर्षदा डोईफोडे धाराशिव यांनी विजेतेपद पटकावले. सर्व विजेते संघ व वैयक्तीक स्पर्धा विजेते खेळाडू राज्य स्पर्धेसाठी अमरावती येथे जाणार आहेत. या सर्वसामान्यांसाठी मराठी हिंदी व इंग्रजी समालोचक म्हणून नाना शिंदे व हरिदास सगळे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी डॉ. किरण झरकर, मनोज चौधरी, पुनम जेउघाले यांनी सूत्रसंचालन केले.