धाराशिव (प्रतिनिधी)- धार्मिक महत्व असलेली महाशिवरात्री यंदा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यानिमित्त शहरातील कपालेश्वर, राजेबाग मंदिरासह तालुक्यातील वडगाव सिध्देश्वर, येडशी येथील मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमा तयारी करण्यात आली आहे. मात्र महाशिवरात्री अवघ्या एक दिवसावर येवून ठेपली असताना पालिकेकडून राजेबाग मंदिर परिसरात पथदिवे बसविले नाहीत.

शहरातील कपालेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. शिवभक्तांकडून राजेबाग मंदिर परिसरातही स्वच्छता व रंगरंगोटी केली आहे. बुधवारी शहरातील दोन्ही मंदिरात मध्यरात्री 12 वाजेपासून पूजा, आरती सुरू होणार आहे. दर्शनासाठी शिवभक्त ग्रामीण भागातून येत असल्याने मंडप उभारणीचे कामही केले आहे. येडशी येथील रामलिंग मंदिर व वडगाव सिध्देश्वर येथेही स्वच्छता मोहीम राबवून विद्युत रोषणाई केली आहे. भाविकांनीही पूजा साहित्याची खरेदी केली आहे. संस्था संघटनांच्यावतीने खिचडी, शाबू, फळे वाटपाचे नियोजन केले आहे. राजेबाग व कपालेश्वर मंदिर परिसरात पुजेचे साहित्य विक्रेते स्टॉटल लावतात. पालिकेने स्वच्छता केली आहे. मात्र राजेबाग मंदिर परिसरातील पथदिवे अद्याप बसविले नाहीत. 

वडगाव (सि.) येथे दि. 23 फेब्रुवारीपासून महोत्सवास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी रात्री 9 ते 11 दरम्यान युवकवीर ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांचे किर्तन होणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 6 ते 7 श्री. सिध्देश्वरांच्या पालखीचे गावात सभामंडपात आगमन होईल. सकाळी 8 ते 10 शिवलिलामृत ग्रंथ वाचन होणार आहे. दुपारी 1 ते सायंकाही भारूडाचा कार्यक्रम तर सायंकाळी 7 ते 10 वाजता सिध्देश्वर महाराज यांच्या पालखीचे गावातून सवाद्य मिरवणुकीचे सिध्देश्वर मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. रात्री 11 वाजता श्री सिध्देश्व मंदिरामध्ये श्री च्या पालखीची प्रदक्षिणा व नंतर शोभेची दारू व नंतर सिध्देश्वर मंदिरामध्ये हरिजागर होईल.

 
Top