धाराशिव (प्रतिनिधी)- बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्याना आता करातून सूट मिळण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने उत्पन्न वाढविण्यासाठी काय केल? उत्पन्नच नसेल त्यांनी करमाफीच काय करायच असा सवाल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना समोर ठेवून कधीतरी धोरण ठरविणार आहात की नाही ? असाही प्रश्न खासदार ओमराजे यांनी मोदी सरकारला केला आहे.
खासदार ओमराजे म्हणाले की, या सरकारचे आतापर्यंतचे सर्व अर्थसंकल्प हे आकड्याचे खेळ व घोषणाचा पाऊस एवढ्यापुरते मर्यादित आहेत. शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट करु म्हणणार हे सरकार आता त्याविषयी एक चकार शब्द काढत नाही, शेतकऱ्यांना वीज, पाणी व हमीभाव या तीन गोष्टी आवश्यक असतात. धोरण करताना या तीनही बाबीत कमालीचा निरुत्साह दिसतो. असा धोरण लखवा असल्यावर त्या शेतकऱ्यांच उत्पन्न कस वाढणार ? शिवाय आता डाळीच्या उत्पादन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असं म्हणतंय पण पुन्हा मूळ मुद्दा येतो हमीभावाचा त्यावर अर्थमंत्री शब्दही काढत नाहीत.
सध्या शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, तो अडचणीत आहे हे माहित असतानाही थोडीतरी संवेदनशिलता या सरकारने दाखवायला हवी होती. उद्योगपतीच लाखो कोटीच कर्ज माफ होत पण आमच्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना लाखाची कर्जमाफी मिळत नाही हे दुर्देवी आहे. शेतकऱ्यांच जगणं हे सरकार कधीच मान्य करेल असं मला वाटत नाही अशी खंत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. आजही आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचं लक्ष साडेसहा टक्केच्या पुढे जात नाही, ही आकडेवारी कोविड काळानंतरची सर्वात कमी आहे. यावरून या सरकारच धोरण व वास्तव परिस्थिती यामध्ये मोठं अंतर असल्याचे अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रीया खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.