भूम (प्रतिनिधी)- परंडा येथे अंमली पदार्थ तस्कर व ड्रग्स माफिया सक्रीय होत आहेत. त्यांवर वेळीच आवर घालण्यात यावा. यासाठी भूम परंडा वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांची तस्करी व पुरवठा होत असून ड्रग्स माफिया गँग तयार झालेल्या आहेत. या गँग च्या माध्यमातून एमडी ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री व तस्करी होत असून तरुण वर्ग नशेच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. यावर वेळीच आवर घालून बंदोबस्त न केल्यास आपल्या राज्याचे आणि देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी उध्वस्त होण्याची शक्यता आहे. यावर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी निवेदनात केली आहे.