धाराशिव (प्रतिनिधी) -आगामी धार्मिक सण,उत्सव आणि आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा -सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हाधिदंडाकारी यांनी जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.हा आदेश ७ फेब्रुवारी २०२५ ते ८ मार्च २०२५ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथे दि.७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान हजरत नानिमा दर्गा उर्स,दि.१२ फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज जयंती,दि. १४ फेब्रुवारी शब-ए-बरात,दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथील श्री महालक्ष्मी यात्रा, दि.१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती,दि. २६ फेब्रुवारी महाशिवरात्री, दि.११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत १० वी व दि.२१ ते १७ मार्चपर्यंत १२ वीच्या परीक्षा संपन्न होणार आहेत.याशिवाय,मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांवर विविध संघटना व पक्षांच्या वतीने आंदोलन, मोर्चे,बंद,उपोषण,रास्तारोको, निदर्शने होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावास मनाई असेल तसेच शस्त्र बाळगण्यास बंदी राहणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.
या आदेशानुसार ७ फेब्रुवारी २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ८ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू राहणार आहे.यामुळे पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यास मनाई असेल. तसेच,शस्त्र बाळगणे,दाहक पदार्थ साठवणे,दगडफेक,विडंबनात्मक कृती, प्रक्षोभक भाषणे आणि घोषणाबाजी यावरही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा,धार्मिक विधी, विवाह सोहळे,शासकीय कार्यक्रम,तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही.मात्र,मोर्चे, मिरवणुका व सभा घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असेल.
जिल्ह्यात यात्रा-जत्रा मोठ्या प्रमाणावर साजऱ्या होतात,तसेच आंदोलने होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत.जिल्हा पोलीस दलाने सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे आदेशात स्पष्ट केले आहे.