धाराशिव (प्रतिनिधी)- 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान छ. शिवाजी महाराज नगरी मधील छ. संभाजी महाराज विचार पीठ, तालकटोरा मैदान दिल्ली येथे अत्यंत उत्साहात पार पडले. विविध कार्यक्रमांनी सजलेल्या या तीन दिवसीय साहित्य शृंखले मध्ये एक आगळा वेगळा आणि खुल्या विचारांसाठी एका खुल्या काव्य संमेलनाचे आयोजन आयोजक संस्था सरहदचे संजय नहार व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान धाराशिवच्या युवराज नळे यांना देऊन धाराशिव जिल्ह्याला सन्मान देण्यात आला होता. या संमेलनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांनी करताना राजकारणी व साहित्यिक यांच्यात मतभेद जरूर असावेत परंतु मनभेद असू नयेत असे आपल्या भाषणात सांगितले. संजय नहार यांनी ग्रामीण भागातील कवींच्या रचना कसदार असून आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन केले. संपूर्ण महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील कवींना देखील प्रत्येक वेळी अशीच संधी देण्यात येईल असे आश्वासन शरद गोरे यांनी केले. तसेच या खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना.
“श्री संजय नहार आणि श्री शरद गोरे यांच्या माध्यमातून राज्यातील तसेच राज्याबाहेरील शेकडो कवी व कवयित्रींना आपल्या कविता, गझल सादरीकरण करण्याची संधी मिळाली व सर्वानीच अत्यंत सुंदर व सकस विचार आपल्या लेखणीतून समाजाला दिला म्हणून श्री युवराज नळे यांनी महाराष्ट्रातील सर्व मान्यवर कवींचे अभिनंदन केले“. संमेलन जस जसे बहरत गेले तस तसे कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढत गेली, शेवटी संमेलनाचा समारोप पत्रकार संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आला. श्री संजय आवटे यांनी आवर्जून म्हटले की या खुल्या मंचा एवढा उत्साह कुठेच पाहायला भेटला नाही, मराठी भाषा अभिजात आहे ती तुमच्यामुळेच असे गौरवोद्गार श्री संजय आवटे यांनी काढले. राज्यभरातील जवळपास 250 कवी व कवयित्रींना या संमेलनात सादरीकरण करण्याची संधी लाभली होती. सूत्रसंचालन पत्रकार तथा कवी विक्रम शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन अमोल कुंभार यांनी केले.