मुंबई (प्रतिनिधी) -मुंबई ही भारताची 'कन्व्हेन्शन कॅपिटल' म्हणून उदयास येत आहे. बांद्रा परिसरात ताज ग्रुपच्या नव्या आणि अत्याधुनिक  हॉटेलमधील आधुनिक कन्व्हेन्शन सेंटरमुळे मुंबईतील व्यावसायिक संधी अधिक वाढतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज ग्रुपच्या बांद्रा परिसरातील नव्या आणि अत्याधुनिक हॉटेलचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष श्री. एन. चंद्रशेखरन, राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, माजी मंत्री दीपक केसरकर ,इंडियन हॉटेल्सचे सीईओ  पुनीत चटवाल तसेच विविध क्षेत्रातील  अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले,  मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे आणि पर्यटन तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे हे हॉटेल भविष्यात मुंबईच्या  एक नवी ओळख निर्माण करेल असा विश्वास  व्यक्त केला. टाटा समूह आणि विशेषतः ताज हॉटेल्सचा भारताच्या विकासात मोठा वाटा आहे. "ताज हे केवळ एक हॉटेल नसून, प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे," असे सांगताना कुलाबातील ऐतिहासिक ताज हॉटेलचा उल्लेख करण्यात आला. तसेच "२० व्या शतकातील कुलाबातील ताजप्रमाणे, २१ व्या शतकातील नवे प्रतिक हे हॉटेल ठरेल," असा विश्वास मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी व्यक्त केला.मुंबईत आणखी नव्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा असलेल्या हॉटेल्सची गरज असून, ताज ग्रुपने मुंबईतील संधी हेरून नव्या प्रकल्पांची उभारणी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिका वेगवान निर्णयात सकारात्मक असेल. "येत्या काळात या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये कुठलाही अडथळा आला, तरी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. प्रशासन ही केवळ नियामक संस्था नसून, विकासाची भागीदार आहे," असे मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. नागपूरमध्ये अजूनही ताज हॉटेल नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. "आशा आहे की, पुनीतजी आज नागपूरसाठीही एक घोषणा करतील!"

याला प्रतिसाद देत नागपूर मध्येही अत्याधुनिक सुविधासह हॉटेल निर्माण करण्याचा टाटा ग्रुपचा विचार असल्याचे ग्रुपने जाहीर केले. या संपूर्ण प्रकल्पामागे टाटा समूहाचे मार्गदर्शक, अध्वर्यू दिवंगत रतन टाटा यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. "रतन टाटा यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही सर्वांनी परिश्रम घेतले. त्यांच्या साक्षीने हा प्रश्न सुटावा, अशी आमची इच्छा होती, आणि ती आता पूर्ण झाली," असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

या सोहळ्याच्या माध्यमातून मुंबईच्या पर्यटन आणि व्यावसायिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स आणि टाटा समूहाचे अभिनंदन केले.याप्रसंगी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी मनोगत व्यक्त केले.तर इंडियन हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांनी प्रास्ताविक केले. 


 
Top