कळंब (प्रतिनिधी) -शालेय शिक्षण विभागाने नुकत्याच सन 2024-2025 च्या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या शिक्षक संचमान्यते मध्ये अनेक त्रुटी झाल्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून प्राथमिक शाळा विस्कळीत होणार आहेत. ही संच मान्यता दुरुस्त करणे गरजेचे आहे.शिक्षक संचमान्यता मध्ये दुरुस्ती नाही झाल्यास व दि 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द नाही केल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय सांगली येथे झालेल्या सिनिअर कौन्सिल मध्ये झाला असल्याची माहिती राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठी शिक्षक संच मान्यता ( शिक्षक पदनिर्धारण ) जाहीर केली आहे ही संचमान्यता ऑनलाईन पद्धतीने झाली असली तरी यात अनेक चुका झाल्यामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांची पदे कमी झाल्यामुळे राज्यात हजारोच्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या झालेल्या चुकामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक शाळेतील 6 ते 8 च्या वर्गाला एकही शिक्षक मिळणार नाही. 

या सिनिअर कौन्सिल सभेस नेते संभाजीराव थोरात, अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राष्ट्रीय आबासाहेब जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष किसनराव इदगे म. ज. मोरे, बळवंत पाटील, सचिन डिंबळे, संजय चेळेकर,मोहन भोसले,राजेंद्र जगताप,बब्रुवान काशीद भक्तराज दिवाने,विनायक शिंदे,चंद्रकांत यादव, रविकुमार पाटील, अनिरुद्ध पवार,सुधाकर पाटील अविनाश गुरव, लहू कांबळे, तात्या यादव.अशोक पवार आदी उपस्थित होते.

 
Top