धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.सन २०२४-२५ साठी मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण) ४०८ कोटी रुपयांपैकी १४१ कोटी १४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.तसेच, १०५ कोटी १५ लाख रुपये विविध यंत्रणांना वितरित करण्यात आले असून,३१ डिसेंबर २०२४ पर्यंत यापैकी ९८ कोटी ७७ लाख रुपये खर्च झाले आहेत.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली २६ जानेवारी २०२५ रोजी झाली.या बैठकीत विविध यंत्रणांकडून निधी खर्चाचा आढावा घेण्यात आला. विकास कामांसाठी निधी खर्च करण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात येत असून,निधी पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.
पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निधी १०० टक्के खर्च करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.उर्वरित निधी लवकरच प्रशासकीय मान्यता मिळवून पूर्णपणे खर्च केला जाईल,अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी दिली.