लोहारा (प्रतिनिधी)- लोहारा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याजवळ तुळजापूर आगाराच्या बसने अचानक पेट घेतला. बस चालकच्या प्रसंगावधानामुळे बसमधील विद्यार्थ्यांसह 70 प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना शुक्रवारी (ता. 14) सकाळी पावणेनऊ वाजता घडली.

तुळजापूर आगाराची बस दुपारी साडेतीन वाजता तुळजापूरहुन लोहारा मार्गे  बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहुन परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते. नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी सहा वाजता बस (क्रमांक एमएच 20 बीएल 2092) बसवकल्याणहुन निघाली सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटसमोर प्रवांशासाठी बस थांबली. त्यानंतर  बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या कॅबीनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. खाली उतरून पाहताच इंजिनला आग लागल्याचे दिसले. चालक घंटे यांनी तत्काळ प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. त्यामुळे बसमधील 70 प्रवाशी बालंबाल बचावले. दरम्यान, मोठी आग लागल्याने लोकमंगल साखर कारखान्याच्या अग्निशामक गाडी बोलावून आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती वाहक बी. ए. गोरे यांनी लोहारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रक तुकाराम घोडके यांना दिली. त्यांनी बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून सखरूप तुळजापूरला सोडले. घोडके यांनी बसला आग लागल्याची माहिती लोहारा पोलिसांना दिली.

 
Top