धाराशिव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा रुग्णालयात जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला. यावर्षीची जागतिक युनानी दिवसाची  Theme- “Innovations in Unani Medicine for Integrative Health Solutions- Way Forward” “एकात्मिक आरोग्य उपायांसाठी युनानी औषधामधील  नवीन उपचार - एक पर्याय” अशी आहे. यावेळी बोलताना, रुग्णांनी युनानी चिकित्सा पद्धतीचा वापर करावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.धनंजय चाकूरकर व  सेवानिवृत्त साथरोग अधिकारी तथा महाराष्ट्र युनानी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शकील अहमद खान यांनी केले.

‌‘हकीम अजमल खान' यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस जागतिक युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात आज युनानी औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. युनानी या चिकीत्सा पद्धतीमध्ये  संपूर्ण शरीरावर लक्ष केंद्रित करून औषध, आहार व जीवनशैली बदल यांचा विचार करून औषधांची उपाययोजना केली जाते. युनानी औषध अनेक रोगावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. युनानी चिकीत्सा पद्धत ही चार तत्व (वायू, जल, अग्नी, पृथ्वी) यांच्या तपासणी करून यामध्ये संतुलन निर्माण करून स्वास्थ्य राखले जाते. असंतुलन झाले तर रोग उत्पन्न होतो. यामध्ये कपिंग, मसाज, शरीर शुद्धीकरण, रक्तविस्त्रावन, आहार, व्यायाम ई. येतात. युनानी चिकीत्सा पद्धतीमध्ये त्वचा विकार, संधी विकार, वृक विकार, लैंगिक विकार, पोटाचे विकार, मानसिक आजार, रक्तविकार व इतर रोगांवर उपचार केले जातात. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, तुळजापूर, कळंब, परंडा येथे युनानी चिकित्सा पद्धतीचे तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत. या तज्ञांचे मार्गदर्शन रुग्णांनी आवश्यकतेनुसार घेण्याचे आवाहन डॉ.धनंजय चाकूरकर यांनी केले.

यावेळी सेवानिवृत्त साथरोग अधिकारी तथा महाराष्ट्र युनानी मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉक्टर शकील अहमद खान यांनी युनानी उपचार पद्धती बाबत सखोल माहिती दिली व मार्गदर्शन केले. युनानी उपचार पद्धती बाबत माहिती देताना डॉ.शकील अहमद खान यांनी युनानीचे संस्थापक हकीम मोहम्मद अजमल खान यांच्या संपूर्ण जीवनाबाबत व त्यांनी युनानी उच्चार पद्धतीबाबत दिलेल्या योगदानाबाबत सखोल माहिती दिली. जनतेला युनानी उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले. युनानी वैद्यकीय अधिकारी डॉ.महेविश शेख (आयुष विभाग धाराशिव) यांनी देखील युनानी उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.फुलारी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.गजानन परळीकर, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद) डॉ.पल्लवी कोथळकर, आयुष वैद्यकीय अधिकारी(आयुर्वेद) डॉ.नौशीन खान, आयुष वैद्यकीय अधिकारी(होमिओपथी) डॉ.सीमा पवार, डॉ.उजमा सय्यद, योग प्रशिक्षक मनोज पतंगे, अधिपरिचारिकासुमित्रा गोरे, समाज सेवा अधीक्षक नवनाथ सरवदे, समुपदेशक सिद्धार्थ जानराव, आयुष औषधनिर्माता भारत हिंगमिरे, फारुख काझी, मनीषा अंगरखे, परिचारिका विदयार्थी, विद्यार्थीनी आणि रुग्ण उपस्थित होते.  

 
Top