कळंब (प्रतिनिधी)- इनरव्हिल क्लब कळंब च्या पुढाकाराने कळंब येथील विविध शालेय व महाविद्यालयीन मुली व युवतींसाठी ह्युमन पॅपीलोमा व्हायरस ( एच पी व्ही) लसीकरण अभियान सुरू करण्यात आले असून त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन, बाल आरोग्य परिषद व स्त्री आरोग्य परिषद यांचे सहकार्य लाभले आहे.
सरव्हाकल कॅन्सर हा आजार एच पी व्ही विषाणूच्या संक्रमणामुळे होतो. उपलब्ध आकडेवारीनुसार सरव्हाकल कॅन्सरमुळे चार पैकी एक महिला दगावते. दर सात मिनिटाला एक महिला मृत्यूमुखी पडते तर एका वर्षात तब्बल ६७ हजार कॅन्सर ग्रस्त महिलांना प्राण गमवावे लागतात. या आजाराचे जोखमीचे वय ५५ ते ६५ वर्ष असले तरी बहुतेक महिलांना तिशीच्या आसपास याची लागण झालेली असते असे आढळून आले आहे. यासाठी मुलींमधे पिरियड सुरू होण्यापूर्वी जर एच पी व्ही लसिची मात्रा दिली तर जवळ जवळ ९७% पर्यंत त्यांना कॅन्सर पासून संरक्षण मिळते. त्यासाठी लसीकरणाची योग्य वेळ म्हणजे ९ ते १४ वर्षे असुन १२ वर्षे वयापर्यंत जर लस दिली तर खूप चांगले परिणाम दिसून येतात असे प्रयोगाअंती सिद्ध झालेले आहे.
६ फेब्रुवारी २०२५ पासुन लसीकरण व जनजागृती अभियाना अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रशाला येथुन अभियानाची सुरूवात होत आहे. शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन १३ फेब्रुवारी पर्यंत सर्व मुली व पालकांना या लसी विषयी सविस्तर माहिती देऊन लाभार्थी मुलींची यादी तयार करण्यात येणार आहे व नंतर लसीकरणाची तारिख घोषित केली जाणार आहे.
सद्यस्थितीत बाजारात एच पी व्ही च्या एका डोस साठी तब्बल ४०००/₹ मोजावे लागतात परंतु या लसीकरण अभियानांतर्गत हीच लस सवलतीच्या दरात म्हणजे प्रती डोस १५००/₹ प्रमाणे उपलब्ध करण्यात आली आहे.
लाभार्थींचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले असून ९ ते १४ वर्ष एक गट असून त्यांना दोन डोस (० आणि ६ महिने) व १५ ते २६ वर्ष यासाठी तीन डोस (०, २ आणि ६ महिने) ची शिफारस करण्यात आली आहे. ही लस उत्तम प्रतीची असून ती भारतीय बनावटीची आहे व १००% सुरक्षित आहे. आपल्या देशात कांही राज्यात हे अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून तेथील महिलांना सरव्हाकल कॅन्सर पासुन मुक्ती मिळताना दिसून येत आहे. आपल्या कळंब शहरात व किंबहुना धाराशिव जिल्ह्यात ही लस पहिल्यांदाच दिली जात आहे हे विषेश. राष्ट्रीय एकात्मिक लसीकरण अभियान ( नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम) अंतर्गत या लसिचा अंतर्भाव करावा व सर्व मुलिंना शालेय स्तरावर मोफत लस द्यावी यासाठी आय एम ए, बाल आरोग्य परिषद व स्त्री आरोग्य परिषद यांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात असुन सरकारने अद्याप अमलबजावणी केलेली नाही व याविषयी सरकार तेवढे गंभीर नसल्याचे दिसून येते.
तरी शहरातील व जवळपासच्या सर्व नागरिक, पालक, शिक्षक व संस्था प्रमुख, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, ई ना आवाहन करण्यात येते की आपल्या घरातील मुलिंना ही लस देऊन तिचे भविष्य सुरक्षित करा. तिला निरोगी ठेवा व सक्षम बनवा. असे संयोजकांतर्फ आवाहन करण्यात येत आहे.
लसीकरण व जनजागृती अभियानाच्या यशस्वितेसाठी इनरव्हिल क्लब अध्यक्ष डॉ प्रतिभा भवर, सचिव डॉ प्रियंका आडमुठे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ वर्षा कस्तुरकर, आय एम ए अध्यक्ष डॉ शितल कुंकूलोळ, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, बालरोगतज्ञ परिषदेचे डॉ अभिजित लोंढे, स्त्री आरोग्य परिषदेचे डॉ शोभा पाटील, डॉ शिल्पा ढेंगळे, डॉ दिनकर मुळे, बोर्ड मेंबर्स डॉ अरुणा गावडे डॉ प्रियांका जाधवर , राजश्री देशमुख, डॉ दिपाली लोंढे व सर्व इनरव्हिल सदस्य तसेच सावित्री बाई फुले प्रशालेचे प्राचार्य काकासाहेब मुंडे, उप प्राचार्य डॉ मिनाक्षी भवर, परमेश्वर मोरे व सर्व कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत .