तुळजापूर (प्रतिनिधी)-  मंदिराचे पावित्र्य रक्षण होण्यासाठी श्री तुळजाभवानी माता मंदिरात वस्रसंहिता लागू करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ ने अध्यक्ष, श्री तुळजभवानी देवस्थान मंदिर यांना निवेदन देवुन केली आहे.

पूर्वी मंदिरांमध्ये सात्विक वेशभूषा करून हिंदू जात असत; मात्र अलीकडे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणामुळे अनेक हिंदू मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत आणि असात्विक वेशभूषेत जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक आहे.

 महाराष्ट्र शासनाने वर्ष 2020 मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केर्ली आहे. इतकेच नव्हे, तर देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये, खाजगी अस्थापने, न्यायालये, पोलीस खाते, राज्य परिवहन मंडळ (एस.टी.) आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्विक वस्त्रसंहिता लागू आहे. विशेष म्हणजे गोव्यातील बहुतांश मंदिरासह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कॅथरेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. महाराष्ट्रातील 550 हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली आहे आणि अनेक मंदिरे वस्त्रसंहिता लागू करण्याच्या तयारीत आहेत. असे निवेदन संयोजक किशोर गंगणे, अँड. शिरिष कुलकर्णी, विनोद रसाळ यांनी दिले. सदरील निवेदन प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सादर केले आहे.

 
Top