धाराशिव (प्रतिनिधी)- महाकाल कलाकारांचे ज्वालांच्या सानिध्यात जल्लोषपूर्ण नृत्य, सजवलेल्या लखलखत्या मेघडंबरी, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी, डिजेवर थिकरणारे युवक अशा जल्लोषपूर्ण वातावरणात धाराशिव येथे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली. शहरातल जिजामाता उद्यानापासून मिरवणुकीला सुरूवात झाली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला.
सात जणांच्या समुहाने काळजाचा ठोका चुकवणारे नृत्य सादर केले. जमिनीवर आगीतूनच त्रिशुळ, डमरू निर्माण करून नृत्याचा वेगळा अविष्कार सादर केला. युवकांसह युवती, महिलांचीही मोठी गर्दी यावेळी झाली होती. मिरवणूक 6 तास चालली. मिरवणुकीत मेघडंबरीचा आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेम होता. विद्युत माळांनी मेघडंबरी सजवलेली होती. यावेळी मिरवणुकीत आकर्षक रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा वेष परिधान करून बसले होते. तसेच महाकालांचा महानंदीची प्रतिकृतीही मिरवणुकीत सहभागी होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व मुर्तीचे पूजन विविध ठिकाणी करण्यात आले. यासाठी शहरात 50 पेक्षा अधिक ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी मध्यरात्री 12 वाजता जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली.