ढोकी (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्लू ची पुष्टी झाल्याने प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ढोकी गावाच्या 10 किमी परिसराला “अलर्ट झोन“ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गजन्य रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 तसेच बर्ड फ्लू नियंत्रण कृती आराखडा (2021) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.या आदेशानुसार बाधित परिसरात नागरिकांची व पक्षी-प्राण्यांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ढोकीतील बाधित परिसर निर्जंतुकीकरण: करण्यात आले आहे.2 टक्के सोडियम हायपोक्लोराइट () फवारून परिसराची स्वच्छता केली. कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण व प्रयोगशाळा चाचणी करण्यात येणार आहे. 10 किमी त्रिज्येत असलेल्या कुक्कुटपालन केंद्रांमधील पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहे.पशुसंवर्धन, आरोग्य, पोलिस, महसूल, ग्रामविकास, वन, जलसंपदा आणि परिवहन विभाग संयुक्तरीत्या उपाययोजना राबविणार आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग अधिक पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, गर्दी टाळावी आणि संशयास्पद घटना तातडीने कळवाव्यात, असे आवाहन धाराशिवचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, यांनी केले आहे
ढोकी ग्रामपंचायतकडून आवाहन
पोलीस स्टेशन परिसर व श्री सुभाष देशमुख यांच्या घराच्या परिसरामध्ये मृत कावळ्याचे रिपोर्ट हे बर्ड फ्ल्यू या रोगाकरीता पॉजीटीव आलेले आहेत. त्यामुळे वरील दोन्ही परिसर प्रशासनाने हाय अलर्ट घोषित केलेले आहेत. तसेच या परिसराची ग्रामपंचातीच्या वतीने 2% सोडियम हयपोक्लोराईटने फवारणी केलेली आहे. तरी सर्व जनतेने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेवून घाबरून न जाता आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच इतर ठिकाणी असे संशयित मृत पक्षी अढळल्यास त्वरित ग्रामपंचायत कार्यालय अथवा पशु वैदकीय दवाखाना येथे कळवावे असे आवहान ग्रामपंचातीच्या वतीने करण्यात येत आहे.
अलर्ट झोन जाहीर ; मांस विक्री बंद
ढोकी पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराचा परिसर अलर्ट झोन म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे ढोकी ग्रामपंचायत यांनी खबरदारी चा उपाय म्हणून ढोकी गावातील सर्व कुकूटपालन व्यावसायिक व मांस विक्री करणाऱ्यांची बैठक घेऊन रविवार पासून ढोकी शहरातील मांस विक्री दुकानें बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.