धाराशिव (प्रतिनिधी)-मध्यमवर्गीय लोकांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी तयार केलेल्या अर्थसंकल्पातील योजना सर्व सामान्य लोकांपर्यत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केले.
शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेस आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, जि. प. च्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे, महिला भाजपाच्या जिल्हाध्यक्ष नंदा पुनगुंडे, प्रविण पाठक, इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कल्याणशेट्टी यांनी 12 लाख प्रयत्नाच्या उत्पन्नाला इन्कम ट्रॅक्समध्ये सुट दिली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय व शेतकऱ्यांचा पैसा बाजार येवून विकसनशील भारताचा विकसित भारताकडे वाटचाल चालू राहील असे सांगितले. या अर्थसंकल्पामधून राज्यात उद्योगाला पायाभूत सुविधांसाठी 50 वर्षे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. देशात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी 200 कॅन्सर सेंटर उभारले जाणार आहेत. कृषीवर आधारित उद्योगासाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात तरतुद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेती व ग्रामीण भागाला बळकटी देणारा असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये ज्या 100 जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे त्यात धाराशिव जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी केली. कौडगाव एमआयडीसीमध्ये 75 एकर जमिनीवर एमएससीबी पार्ट आणि टेक्नीकल टेकस्टाईल पार्क तयार करण्याचे उद्योग उभारले जाणार आहेत. त्याच प्रमाणे पर्यटनवरही भर दिला जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.