धाराशिव (प्रतिनिधी)-कौडगाव एमआयडीसीत होवू घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांना राज्य सरकारच्या खास धोरणांचा मोठा लाभ होणार आहे. भरीव आर्थिक अनुदानसह मूलभूत सोयीसुविधा, व्याज अनुदान, कर परतावा आशा विविध सवलती दिल्या जाणार आहेत. राज्य सरकारने त्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून देशातील नामांकित निर्यातदार कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी निर्णायक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दहा हजार रोजगार निर्मितीचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट आता सोपे झाले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मंगळवारी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांच्या मंत्रालयातील दालनात याअनुषंगाने बैठक घेण्यात आली.यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती अंशु सिन्हा, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल पार्क मध्ये विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उद्योजकांना सुविधा देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले व त्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले.
गुंतवणूकदारांना या सुविधा मिळतील
धाराशिव जिल्हा वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने झोन क्रमांक 2 मध्ये येतो. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार कौडगाव एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना स्थिर भांडवली गुंतवणुकीसाठी 40 % पर्यंत आर्थिक अनुदान, मोठ्या उद्योगांना 35 % पर्यंत तर विशाल अर्थात मेगा उद्योगांसाठी अनुदानाची हीच तरतूद 50 % किंवा जास्तीत जास्त रु.225 कोटी यापैकी जे कमी असेल इतकी भरीव रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे.
विमानतळासह सर्व सुविधा
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती करणारे निर्यातदार उद्योजक आपल्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी यावे यासाठी आपण सतत प्रयत्न केले. त्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आता बळ मिळत आहे. कौडगाव एमआयडीसीमध्ये सर्वार्थाने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. विमानतळ, रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, उजनी जलाशयातून आलेली जलवाहिनी, रिलायन्स गॅस पाईपलाईन त्याचबरोबर याठिकाणी 50 मेगावॅट क्षमतेचा सोलार प्रकल्प यापूर्वीच कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे देशातील मोठे उद्योजक आपल्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. धाराशिव एक शांत, विकासाभिमुख आणि उद्योग पूरक शहर आहे. याठिकाणी गर्दी, गुन्हेगारी, प्रदूषण अजिबात नाही. कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. स्थानिक अर्थकारणाला या उद्योगांमुळे मोठी गती मिळणार आहे. भारताला टेक्निकल टेक्सटाईल पुरवठा करणाऱ्या परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रण देणार आहे. भारताने 2024 या आर्थिक वर्षात विविध परदेशी कंपन्यांनी उत्पादित केलेले 18,806 कोटींचे टेक्निकल टेक्सटाईल आयात केले आहेत अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.