धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्ल्यू आजार उघडकीस आला. मागील काही दिवसापासून सातत्याने मृत कावळे आढळून येत आहेत. ढोकीतील एक व्यक्ती तापीने फणफणला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. बर्ड फ्ल्यूचा संशय असल्याने आरोग्य विभागाने गुरूवारी सायंकाळी या व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी घेवून पुणे येथील प्रयोगशाळे पाठविला आहे. 

ढोकी गावातील पोलिस ठाणे परिसरात 21 फेब्रुवारीला काही कावळे मृतावस्थेत पडलेले पहिल्यांदा आढळून आले होते. पशुसंवर्धन विभागाने यातील दोन कावळे तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविले. 24 फेब्रुवारीला प्रयोगशाळेकडून मिळालेल्या अहवालातून कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ढोकी गावच्या 10 किमी परिघातील परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. सध्या या परिसरातील पशु पंक्ष्याचे सर्वेक्षण पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. एकीकडे या उपाययोजना केल्या जात असतानाच ढोकी गावातील एक व्यक्ती 25 फेब्रुवारीला धाराशिव शहरातील एका खाजगी रूग्णालयात ताप कमी होत नसल्याने दाखल झाला आहे. ताप सतत चढ-उतार होत असल्याने डॉक्टरांनी या व्यक्तीस आवश्यक ती काळजी घेत रूग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. मात्र पक्षातील साथ लक्षात घेत त्यांना संशय आल्याने त्यांनी आरोग्य विभागास याबाबतची माहिती तातडीने दिली. या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी या व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला असून, तो तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्टिट्युट व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहे. 


स्वॅब पुण्याला पाठविला

सध्या ढोकी येथे बर्ड फ्ल्यूची पक्षात साथ दिसून येत आहे. एका व्यक्तीचा ताप कमी होत नसल्याने संशयित व्यक्तीचा स्वॅब पुणे येथील प्रयोगशाळेत अधिक तपासासाठी पाठविण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या संदर्भात तपासणी अहवाल येईल. या काळात लोकांनी पुर्ण शिजवलेले अन्न खाणे आवश्यक आहे. 

डॉ. सतिश हरदास जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव


कावळ्यांच्या मृत्यूची संख्या 31 वर

ढोकी येथील परिसरात शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी दुपारपर्यंत बर्ड फ्ल्यूने मृत्यू पावलेल्या कावळ्यांची संख्या एकूण 31 झाली आहे. दररोज दुपारी 12 वाजता या संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवावा लागतो. त्यामुळे रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंतचा अहवाल देणे आवश्यक आहे. 27 फेब्रुवारीच्या रात्री ते 28 फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत एकूण 3 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. 27 फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत एकूण 28 कावळ्यांचा मृत्यू झाला होता. 

डॉ. आशिष टेकाळे


 
Top