भूम (प्रतिनिधी)-  पूर्वी भाजपाचा कार्यकर्ता चेष्ठेचा विषय होता, आता गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. धाराशीव जिल्ह्याचे भाजपाचे संपर्कमंत्री व राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्याच्या पहिल्याच जाहिर कार्यक्रमात प्रतिपादन केले आहे. 

रविवारी दि. 23 फेब्रुवारी जिल्हयाच्या संपर्कमंत्रीपदी निवड झाल्याबद्दलमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन परंडा येथे तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री गोरे बोलत होते. यावेळी आमदार सुरेश धस, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार विजय देशमुख, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, बाळासाहेब क्षिरसागर, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

पुढे बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, भाजपाची वाटचाल संघर्षातून झाली. ग्रामिण भागाच्या विकासासाठी ज्याला कुणी नाही त्याला 2515 आहे, घरकुल आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सत्तेतील वाटा प्रत्येक कार्यकर्त्यांना मिळवून देणार आहे. आमच्या भागात तुळशीच्या लग्नाला उस मिळत नव्हता. आता पाच साखर कारखाने आहेत. मराठवाड्याचा दुष्काळ मुख्यमंत्री फडणवीस संपवणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आमदार धस, आमदार देशमुख, आमदार पाटील, माजी आमदार राऊत, जिल्हाध्यक्ष चालुक्य यांची भाषणे झाले. प्राप्ताविक किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड संतोष सुर्यवंशी यांनी केले. सुत्र संचलन निशिकांत क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष ॲड गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमेश गोरे, धनंजय गायकवाड, अरविंद रगडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


पहिल्याच दौऱ्यात आव्हान

भाजपाचे धाराशिव संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांनी झालेल्या कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निधी वाटपात भाजपाला बरोबरचे स्थान द्या, नाहीतर आमच्या हक्काचा निधी कसा मिळवायचा यात आपण सक्षम आहोत, असे आव्हान संपर्कमंत्री गोरे यांनी सरनाईक यांना दिले आहे.


सत्कार स्विकारणार नाही

आमच्यामुळेच घड्याळाला अन्‌‍ धनुष्यबाणाला राज्यात मतदान झाले. असे सांगत आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुबियांना न्याय मिळेपर्यंत सत्कार स्विकारणार नसल्याचे आमदार धस यांनी बोलताना सांगीतले. मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच योगदान असल्याचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.

 
Top