धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव या जिल्हा मुख्यालया पासून अगदी जवळ असलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव एमआयडीसीत 80 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापैकी अंदाजे 150 एकरचा औद्योगिक वापर करण्यात येणार आहे. यात 75 एकर जमिनीवर मध्यम,लघु व सूक्ष्म उद्योग पार्क उभारण्याचे तत्वतः ठरले आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक करून ज्यांना माध्यम,लघु व सुक्ष्म उद्योग उभे करायचे आहेत अशा इच्छुकांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांकडे नोंदणी करावी. असे आवाहन आपण 28 जानेवारी रोजी केले होते. त्यानुसार आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा आणि परिसरातील तब्बल 94 उद्योजकांनी नोंदणी करून वडगाव एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दर्शविली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी वडगाव सिद्धेश्वर येथील औद्योगिक क्षेत्रात होऊ घातलेल्या 'एमएसएमई पार्क' संदर्भात धाराशिव येथील लघुउद्योग भारती या औद्योगिक संघटनेच्या समन्वयाने उद्योजकांसोबत लघु व सूक्ष्म उद्योग स्थापनेविषयी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली झाली. या बैठकीस मोठ्या संख्येने धाराशिवसह इतर जिल्ह्यातील उद्योजकही उपस्थित होते. यावेळी वडगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रामध्ये उद्योग उभारणीकरिता अनुदान, सहाय्य, भूखंडाच्या वाटप पद्धती, पायाभूत सुविधांकरिता आवश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,अमित शिंदे,लघुउद्योग भारती मराठवाडा विभागाचे सहसचिव प्रवीण काळे, लघुउद्योग भारती धाराशिवचे अध्यक्ष राजाभाऊ कोंढारे, एमआयडीसीच्या वतीने खाडे व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने घोडके, संजय देशमाने, निशांत होनमुटे, कुमार स्वामी, विकास बेलुरे, प्रशांत कुलकर्णी, गजानन मसलेकर, संजय शेटे यांची उपस्थिती होती.