नळदुर्ग (प्रतिनिधी)- कंचेश्वर शुगर यांच्याकडून गेल्या वर्षीचा दोनशे रुपयेचा हप्ता मिळावा, म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर गेल्या दोन दिवसापासून ही आंदोलन करीत आहेत. दरम्यान या सदर्भात कारखान्याचा कोणताही अधिकारी शेतकऱ्याकडे फिरला नसल्याने शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या उसाच्या गाड्या कारखाना समोर अडविल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उसाच्या गाड्या दोन दिवस कारखान्यासमोर थांबून आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या वर्षी मंगरूळ, तालुका तुळजापूर येथील कंचेश्वर शुगर हा कारखाना मांजरा समूहाकडे चालविण्यासाठी देण्यात आला आहे. दरम्यान कारखाना गेल्या वर्षी गाळप करीत असताना शेतकऱ्यांना प्रति टन 2600 रुपये भाव देण्यात आला. इतर कारखान्यांनी या कारखान्याच्या पेक्षा जास्तीचा भाव शेतकऱ्यांच्या उसला दिला आहे. मात्र कंचेश्वर शुगरने गेल्या वर्षी 2600 रुपये प्रति टन ऊसाला भाव दिल्यानंतर पुन्हा दुसरा हप्ता देण्यात आला नाही. शेतकऱ्यांना वाटले होते कारखाना दुसरा हप्ता दिवाळीच्या वेळेस देईल पण कारखान्याने शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरवले. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा दुसरा हप्ता म्हणून शेतकऱ्यांची दोनशे रुपयाची प्रतिष्ठानास मागणी होत होती. परंतु कारखान्याने ही मागणी मान्य केली नसल्याने शेतकऱ्यांनी दि. 6 फेब्रुवारी 2025 पासून कारखान्यासमोर सुमारे 200 ते 250 शेतकऱ्यांनी दोनशे रुपयेचा प्रति टनास हप्ता देण्यात यावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कारखान्याचे अधिकारी, पदाधिकारी फिरले नाहीत
या आंदोलनास कारखान्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून हे आंदोलन गेली दोन दिवस चालू आहे. दरम्यान कारखान्यासमोर शेतकऱ्यांनी कारखान्यात गाळपसाठी ऊस आणणाऱ्या वाहतूक करणाऱ्या ट्रक गाड्या शेतकऱ्यांनी अडवले असल्याने गेल्या दोन दिवसापासून कारखान्यासमोर उसाच्या गाड्या गाळपावीना तशाच थांबून आहेत. कारखान्याच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर उसाच्या गाड्यांच्या रंगाच्या रांगा लागल्या असून दि. 8 फेब्रुवारीच्या दुपार पर्यंत एकही अधिकारी किंवा पदाधिकारी कारखान्याकडे किंवा आंदोलकांकडे फिरकला नसल्याने आंदोलन चालू होते.