कळंब (प्रतिनिधी)- येथील बस स्थानकात केवळ मोठ्या तीनच लाईट चालू आहेत. बाकी सर्व लाईट बंद अवस्थेत दिसतात . केज पॉईंट पूर्णतः अंधारातच आहे. यामुळे राप प्रशासनाने तात्काळ दिवे लावून सर्व बस स्थानक परिसरात उजेड करावा. अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.
कळंब बस स्थानकाचा परिसर जवळपास पाच ते सहा एकराचा आहे एवढ्या मोठ्या परिसरात बस स्थानकासमोरच केवळ दोन मोठे व शेजारी एक छोटा असे तीनच बल्ब आहेत. त्यामुळे परिसरात संपूर्ण अंधार असतो. या अंधाराचा फायदा घेऊन अनेक वेळेस चोरांनी प्रवाशांना लुटीचे प्रकार घडले आहे. यामध्ये प्रवाशांना मारहाण करणे बॅगा लूटणे खिसे कापणे, मोबाईल पळवणे अशा अनेक घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. पहाटेच्या वेळी बस स्थानकावर पुणे, कोल्हापूर, मुंबई, बोरवली अशा अनेक रात्रराणी बसेस येतात. त्यामुळे प्रवाशांची चढउतार नेहमीच होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राप प्रशासनाने सुरक्षारक्षक सुद्धा नेमला जात नाही किंवा रात्रपाळीसाठी एखादा वाहतूक नियंत्रकाची सुद्धा नियुक्ती बस स्थानकावर केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा ही रामभरोशीच आहे. राप प्रशासनाने सुरक्षारक्षक हे केवळ आगारासाठीच नेमले आहेत. आगारांमध्येही अनेक आरटीओने दंडापाई किंवा परमिट नसलेल्या अशा भंगार गाड्या आत मध्ये लावलेल्या आहेत. त्यामुळे आगारातील अनेक वाहनांची दाटीवाटी झाली आहे. कळंब बस स्थानक परिसरात राप प्रशासनाने तात्काळ दिवे लावून उजाड करावा. अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.