धाराशिव (प्रतिनिधी)-शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या उत्पन्नात भर पडावी,यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन योजनेअंतर्गत (ATMA) कळंब तालुक्यातील शेळका (धानोरा) येथील सयाजी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरली आहे.
या कंपनीने कृषी विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या बियाण्यांची ३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली.त्यानंतर सुतळी बारदान्यावर QR कोड लावून सोयाबीन खरेदी केली. विशेष म्हणजे, बाजारभावापेक्षा अधिक ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर दिल्यामुळे शेतकऱ्यांचा या कंपनीवरील विश्वास वाढला आहे.
सन २०१८ साली ८५० पुरुष आणि ६५० महिला,असे एकूण १५०० शेतकरी एकत्र येऊन सयाजी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली.पाच संचालकांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.सन २०२१ पासून कंपनीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. स्मार्ट योजनेअंतर्गत कंपनीने १ कोटी १५ लाख रुपये खर्चून १००० टन धान्य साठवणूक क्षमता असलेले गोदाम आणि ३० लाख रुपयांची मशनरी शेड बांधले. याशिवाय २५ लाख रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवली असून ४७ किलोवॅटचा सोलर प्लांट उभारणीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सन २०२१-२२ मध्ये पोखरा योजनेअंतर्गत १३० टन क्षमतेचे गोडाऊन बांधण्यात आले.या गोडाऊनसाठी एकूण २० लाख रुपये खर्च आला असून यासाठी शासनाकडून १०.५ लाख रुपये अनुदान मिळाले आहे. कंपनीकडून प्रमाणित बियाणे सभासद शेतकऱ्यांना पुरवले जातात.पिकाच्या काढणीनंतर चाळणी प्रक्रिया करून QR कोड लावलेल्या सुतळी बारदान्यात पॅकिंग केले जाते.हमाली किंवा इतर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय शेतकऱ्यांना एकरकमी रक्कम दिली जाते. पूर्वी माल प्रक्रिया करण्यासाठी इतरांना प्रति क्विंटल १०० रुपये द्यावे लागत होते, परंतु आता ही प्रक्रिया कंपनी स्वतः करत असल्यामुळे खर्चात बचत होत आहे. संचालक आणि सदस्यांनी नियोजनबद्ध कामकाज करून कंपनीच्या पारदर्शक धोरणामुळे शेतकऱ्यांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.सयाजी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पारदर्शक व्यवहार यामुळे इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.