तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान तामलवाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दि.25 फेब्रुवारी रोजी लेझीजमच्या लयबद्ध तालात भव्य मिरवणुक काढुन उत्सवाची सांगता करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे शिवतीर्थ किल्ले रायगड ते तामलवाडी दि.11 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत 40 शिवप्रेमींच्या सहकार्याने पायी शिवज्योत आणण्यात आली. दि.19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर यांनी शिवज्योतचे स्वागत केले. तसेच गावातील मुस्लिम बांधव, महीला भगिनी व मुकुंद गायकवाड यांच्या वतीने शिवज्योतचे स्वागत करण्यात आले व नंतर सपोनि गोकुळ ठाकुर यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करुन शिवमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवजन्मोत्सवानिमीत्त दि.22 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये मुलींनी पोवाडा, भाषण, नृत्याविष्काराचे सादरीकरण करुन उपस्थित नागरीकांची मने जिंकली.दि 23 फेब्रुवारी रोजी लहान मुले - मुली यांच्यासाठी संगीत खुर्ची घेण्यात आली. दि.24 रोजी गावातील महीलांच्या हस्ते छत्रपतींचे पुजन करण्यात आले. दि.25 फेब्रुवारी रोजी लेझीमच्या लयबद्ध तालात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज श्रीगुरु कान्होबा महाराज देहुकर यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन करुन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी गावातील भिमज्योत तरुण मंडळ, व मुस्लिम बांधवांनी छत्रपतींच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून पुजन केले. सोलापुरचे माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नानासाहेब काळे यांनी मिरवणुकीस उपस्थित राहुन अर्धा तास लेझीम खेळले. यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा फेटा घालून यथोचित सन्मान करण्यात आला. मिरवणुकीदरम्यान सैफ बेगडे, निजाम शेख व मित्र मंडळाच्या वतीने नाष्टा व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लेझीमचे लयबद्ध सादरीकरण करुन उपस्थितांना डोलायला लावले. फटाक्यांची आतषबाजी, जय भवानी जय शिवराय च्या जयघोषाने परीसर दणाणून गेला होता. छत्रपती शिवरायांची मिरवणूक पार पाडण्यासाठी प्रत्येकाने, विविध समाजातील नागरीकांने आपापल्या परीने सहकार्य केल्याने सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने उत्सव अध्यक्ष सुधीर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.