धाराशिव (प्रतिनिधी)- दिल्ली येथे पार पडलेल्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात धाराशिव येथील साहित्यिकांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या कल्पनेतून आणि सरहद संस्थेचे मुख्य आयोजक संजय नहार यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खुल्या कवी संमेलनामुळे धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील शेकडो साहित्यिकांना दिल्ली येथे साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहता आले. त्याचे चीज धाराशिवच्या साहित्यिकांनी केले.
धाराशिव येथील साहित्यिक युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खुल्या कवी संमेलनात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अनेक नवोदित तसेच ज्येष्ठ व बुजुर्ग साहित्यिकांच्या मांदियाळीत धाराशिव जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
धाराशिव जिल्ह्याचे जेष्ठ साहित्यिक रवींद्र शिंदे यांनी सादर केलेल्या 'रंग पानाचा हिरवा ग माझ्या मनात घुमतोय पारवा ग' या लावणीने रसिकांना डोलावयास भाग पाडले.
मीना महामुनी यांच्या 'जरी ओलांडली चौकट या गझलेने, प्रतिभा मगर यांच्या काव्य सुद्धा स्त्रीच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचेच दर्शन घडवतात, सीमा प्रश्नाची व्यथा कवी रवींद्र पाटील यांनी मांडली. तर कृष्णा साळुंखे यांची गझल गाजली. कवयित्री सुवर्णा पवार, कवी युसुफ सय्यद, अमोल कुंभार, ॲड जयश्री तेरकर, कवी विक्रम शिंदे, कवी लक्ष्मण हेंबाडे यांनी कविता सादर केल्या. या रंगलेल्या बहारदार कवी संमेलनामध्ये धाराशिव व धाराशिव बाहेरील अनेक कवींना संधी मिळाल्यामुळे एक जल्लोषाचे वातावरण होते. कवी संमेलनाचा समारोप कवी संमेलनाचे अध्यक्ष युवराज नळे यांनी केला. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शरद गोरे यांनी केले.