धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील ढोकी येथे गेल्या तीन-चार दिवसापासून सलग एक-दोन कावळ्यांचा मृत्यू होत आहे. गेल्या चार दिवसात ढोकी येथील पोलिस स्टेशन व सुभाष देशमुख यांच्या घराचा परिसर याभागात एकूण 8 कावळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे पशु वैद्यकीय पथकाने पुढील तपासासाठी मृत पावलेल्या दोन कावळ्यांचे सॅम्पल मध्य प्रदेशातील भोपाळ येथे तपासणीसाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी पाठविले होते. भोपाळ येथील अहवाल दि. 24 फेब्रुवारी रोजी रात्री आला. या अहवालानुसार कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्युमुळे झाला असल्याचा अहवाल पशु वैद्यकीय पथकास प्राप्त झाला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्ल्युचा प्रवेश झाला आहे. 

दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच पक्ष्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे सूचित केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बर्ड फ्ल्यूचा हा प्रकार कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम करू शकतो. 


अलर्ट झोन जाहीर

ढोकी शहरातील पोलीस स्टेशन परिसर व सुभाषराव देशमुख यांच्या घराचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आला. दरम्यान, ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून ढोकी गावातील सर्व कुक्कुटपालन व्यवसायिक व मांस विक्री करणाऱ्यांची बैठक घेऊन रविवारपासून मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व दुकाने बंद आहेत. दरम्यान पोलिस स्टेशन व सुभाष देशमुख यांच्या घराचा परिसरात निरजतुकीकरण करण्यात आले आहे अशी माहिती ढोकी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. आशिष टेकाळे यांनी दिली. 

 

 
Top