वाशी (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील कामगारांना आणून त्यांना ओलिस ठेवत त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेण्याचा प्रकार वाशी तालुक्यात शुक्रवारी उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशात यासंदर्भात दाखल तक्रारीवरून तपासाला गती मिळाली. यानंतर 32 मजुरांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील ललितपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील काही मजुरांना वाशी तालुक्यात ओलीस ठेवून बळजबरीने काम करून घेत असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना दिली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्यासह तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी, वाशी ठाण्याचे पोलिस अधिकारी, जनसाहस ाऊंडेशनच्या साधना गायकवाड, लखनौचे हिमांशू वर्मा व अन्य सामाजिक संस्थांचे पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली. यांनी मंगळवारी (दि.4) तालुक्यातील पिंपळगाव (को.) या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील मडावरा येथील 11 पुरूष, 8 स्त्रिया व 15 बालके रमाकांत लाड यांच्या शेतात ऊस तोडीचे काम करत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी पोहोचलेल्या समितीने विचारपूस केली. नंतर मजुरांना 200 रूपये प्रति दिवस रोजगाराप्रमाणे 45 दिवसापूर्वी कामावर आणले असल्याची माहिती मिळाली. मजुरांनी काम करण्यास नकार देवूनही त्यांना त्यांची पगार न देणे, गावाकडे जाण्यास मज्जाव करणे यासह बळजबरी काम करून घेत असल्याची माहिती मिळाली. या बाबत धाराशिव कामगार अधिकारी गुणवंत कोनाळे यांच्या फिर्यादीवरून माखन बिजपुरी सागर (मध्यप्रदेश) व अनिल जाधव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व मजुरांना वाशी पोलिस ठाणे व त्या नंतर कामगार विभागाच्या ताब्यात देण्यात येवून सुटका केली. 

 
Top