धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला.धाराशिव जिल्ह्यात एकूण 34303 घरकुलांना मंजुरी मिळाली असून,यातील 19 हजार 596 लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा - 2 अंतर्गत सन 2024-25 साठी जिल्ह्यातील 37860 घरकुलांचे उद्दिष्ट होते.त्यापैकी 34303 घरकुलांना मंजुरी मिळाली असून,मंजुरीचे प्रमाण 90.60 टक्के आहे.पहिला हप्ता म्हणून प्रती लाभार्थी 15,000 रुपये या प्रमाणे एकूण 28 कोटी 91 लाख 25 हजार रुपये 19 हजार 596 लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे लाभ पुढीलप्रमाणे आहेत.यामध्ये 1.20 लाख रुपये घरकुल बांधकामासाठी 90 दिवस मजुरीसाठी 26 हजार 730 रुपये (महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून),12,000 रुपये शौचालयासाठी (स्वच्छ भारत मिशन अंतर्गत) देण्यात येतात.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ग्रामीण भागात घरकुलांसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळावे,लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी अधिक निधी द्यावा, घरकुलांसाठी मोफत रेती द्यावी,तसेच घरांवर सौरऊर्जा यंत्रणा बसवावी,अशी मागणी सरकारकडे केली. या कार्यक्रमाला डॉ.मैनक घोष (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद), विलास जाधव,मेघराज पवार,संजय ढाकणे यांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघराज पवार यांनी केले. आभार संजय ढाकणे यांनी मानले.

 
Top