धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम 2021 अंतर्गत ग्रामीण भागातील नोंदणीकृत 112 खाजगी रुग्णालयाची तपासणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांचे मार्गदर्शनात नियुक्त केलेल्या पथकाने केली. ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालय तपासणी मोहिमेत रुग्णालयांची खाजगी व्यावसायिकाकडून नियमांचे काटेकोर पालन होते किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली. तसेच रुग्णालयातील मंजूर खाटा व प्रत्यक्षात असलेल्या खाटा, जैव कचरा व्यवस्थापन प्रमाणपत्र अग्निशामक प्रमाणपत्र,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र यांची पडताळणी करण्यात आली.
जिल्ह्यातील तालुकानिहाय तपासणी केलेली रुग्णालये
धाराशिव - 17,तुळजापूर -20,कळंब -11,उमरगा -16,भूम -20,वाशी -3, परडा -18 आणि लोहारा - 7 अशा एकूण 112 रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच नोंदणीकृत रुग्णालयांची ही तपासणी वैद्यकीय अधिकारी पथकाकडून करण्यात आली.तपासणीमध्ये हॉस्पिटल स्वच्छता, मंजूर खाटा संख्या,जैव कचरा व्यवस्थापन प्रमाणपत्र,अग्निशामक प्रमाणपत्र आणि तपासणी शुल्क दरपत्रक तसेच शासनाच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते किंवा नाही याची पाहणी या नियुक्त पथकाने केली. ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळल्या त्या रुग्णालयांना व नोंदणी परवानगीचे नुतनीकरण केले नाही अशा रुग्णालयांना नुतनीकरण करण्यासाठी पत्र देण्यात आले.