धाराशिव (प्रतिनिधी)- वीजबिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजनेचा लाभ घेत काल पर्यंत धाराशिव मंडळातील 1 हजार 585 वीजग्राहकांनी लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे 31 मार्च अखेर पर्यंत देण्यात आलेल्या वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यातील महावितरणच्या 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी 1 सप्टेंबरपासून अभय योजना सुरू केली होती. सदर योजनेस 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे योजनेत अजूनही सहभागी होऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
धाराशिव जिल्हयातील धाराशिव,भूम, परंडा, कळंब, तेर व वाशी या उपविभागांचा समावेश असलेल्या धाराशिव विभागातील 911 वीजग्राहकांनी 81 लाख रूपयांचा भरणा करत 39 लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर तूळजापुर, लोहारा व उमरगा उविभागाचा समावेश असलेल्या तूळजापुर विभागातील 674 वीजग्राहकांनी 59 लाख रूपयांचा भरणा करत 30 लाख रूपयांची सुट मिळवली आहे. या सर्व वीजग्राहकांचा खंडीत झालेला वीजपुरवठा पुनर्जीवीत करण्यात आला आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
अभय योजनेत मूळ बिलाच्या 30 टक्के रक्कम भरून ऊर्वरित 70 टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेऊन चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.