धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

धाराशिव जिल्हयात चार लाख ,62 हजार 872 हेक्टर  क्षेत्रावर  सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. त्यामुळे सोयाबीनचे सरासरी उत्पादन 16.98 क्विंटल एवढे झाले असुन एकुण उत्पादकता 78 लाख 59 हजार 566 क्विंटल पर्यंत झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात 35 हजार 400 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केली होती. त्यापैकी दहा डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 रोजी एकूण नऊ हजार 380 शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे. एकुण दोन 41 हजार क्विंटल सोयाबीनचे खरेदी झालेली आहे.  म्हणजे जवळपास नाव नोंदलेल्या 25 हजार शेतकऱ्यांची अद्यापपर्यंत खरेदी होणे बाकी आहे. सध्या खरेदी केंद्रावर दोन - दोन किलोमिटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. खरेदी केंद्र चालकाकडून कडता, चाळणी या नावाखाली सोयाबीन खरेदीची मुदत संपत असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. केंद्र सरकारने खरेदीला मुदतवाढ देताना राजस्थानसाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली परंतु महाराष्ट्रातील खरेदी केंद्राला फक्त 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली हा दूजाभाव का? असा प्रश्न देखील आमदार पाटील यांनी श्री. फडणवीस यांना विचारला. 

धाराशिव जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

 
Top