धाराशिव (प्रतिनिधी) - नूतन प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव मध्ये आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी घेतला डिजिटल बँकिंगचा अनुभव. येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर मध्ये आनंद मेळावा संपन्न झाला. यामध्ये शाळेतील 230 विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल शाळेत लावले होते. मेळाव्याचे उद्घाटन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती धाराशिवच्या अध्यक्षा डॉ. वैशाली बलवंडे , मराठा महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई शिंदे, संस्था सदस्य आदित्य पाटील, संतोष कुलकर्णी व डॉ.मंजुळाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीचा अनुभव घेतला तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले व्यवहार डिजिटल बँक प्रणालीचा वापर करून केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे, रामराजे पाटील , रमेश वागतकर, नितीन देशमुख, शितल देशमुख, उषा मिसाळ, संध्या जाधव यांनी परिश्रम घेतले.

 
Top