भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील तेरखेडा शिवारातील सर्वे नंबर 1281 मध्ये सुरू असलेल्या छोटूमिया दारूवाले यांचे फटाका कारखान्यात दि. 29 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट होऊन आठ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. तेरखेडा येथील फटाका कारखान्यात मागेही अनेक वेळा अशा घटना घडलेल्या असून फटाका कारखान्यातील कामगारांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेरखेडा येथील सर्वे नंबर 1281 मध्ये छोटूमिया दारूवाले यांचा फटाका कारखाना असून कारखाण्यात तयार केलेले फटाके कारखाना परिसरात वाळत ठेवलेले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सर्व कामगार दुपारचे जेवण करीत असताना कारखान्याजवळ असलेल्या शेतकऱ्याने शेतातील बांध पेटविला. त्यावेळी ठिणगी उडून कारखाना परिसरात पडली. त्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. यामध्ये कारखान्याच्या खोलीचे पत्रे उडून खोली उध्वस्त झाली. या स्फोटात फटाका कारखान्यातील कामगार अनिल तोरडमल वय 27 वर्ष, चंद्रकांत घाटोळे वय 48 वर्ष, साराहाई गांधले वय 60 वर्ष, शोभा वराडे वय 40 वर्ष हे चार कामगार गंभीर स्वरूपात भाजले. तर मंजुषा होळे वय 45 वर्ष, सोनाली घायसमुद्रे वय 23 वर्ष, शारदा होळे वय 46 वर्ष, अभिजीत घायसमुद्रे वय 20 वर्ष हे किरकोळ भाजले असून सर्व जखमींना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे व तलाठी पालखे यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला असून येरमाळा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.
यापूर्वी अनेकदा स्फोट
यापूर्वीही तेरखेडा येथील फटाका कारखान्यात अशा स्फोटाच्या अनेक घटना घडलेल्या असून अनेक कामगार गंभीर जखमी झालेले आहेत. मात्र कारखाना मालकाकडून योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात नसल्यामुळे कामगारांच्या जिवीताचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. फटाका कारखान्यात स्फोटाच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना प्रशासनाकडून राबवाव्यात अशी मागणी होत आहे.