नळदुर्ग (प्रतिनिधी)-  शासनाच्या वेळेचे बंधन न पाळता किंवा शाळेत पर्यायी शिक्षक न देता स्वत:च्या मनमानी प्रमाणे शाळेत रजेचा अर्ज न ठेवता केवळ लाडक्या भावाच्या जीवावर शाळा सोडून तालुक्याच्या ठिकाणी मिटींग आहे सांगून शाळेला बुटटी मारणाऱ्या शिक्षकावर गटशिक्षण अधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

या बाबत अधिक माहीती अशी की, मैलारपूर तांडा ता. तुळजापूर येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण पट संख्या ही दहा आहे. ही शाळा पहिली ती चौथी पर्यंत आहे. ही शाळा मुर्टा ग्रामपंचायत अंतर्गत येते. दरम्यान या शाळेत असणारे एक शिक्षक शाळेत बऱ्याच वेळा न सांगता शाळा सोडून जात असल्याची तक्रार नागरीकांतून करण्यात येत आहे. शाळेला उशीरा येणे, शाळेतून दुपारी तीन वाजता परत जाणे यामुळे या शिक्षकाची मनमानी मोठया प्रमाणात चालत आहे, तांडयातील कोणीच विचारत नाही याचा फायदा घेत हा शिक्षक शाळेत कधी ही येतात आणि कधीही जातात. धाराशिव येथून हे शिक्षक शाळेला ये जा करीत असतात. त्यामुळे सतत शाळेला उशीर होत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत, अशातच शुक्रवार दि. 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी ही शाळा सव्वा दहा वाजे पर्यंत उघण्यात आली नव्हती. 

दरम्यान या संदर्भात केंद्र प्रमुख हरी महाबाले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधीत शिक्षकाची क्रिडा स्पर्धेत सहभाग असेल तरच ते शाळा सोडून जावू शकतात. मात्र तसे पत्र ही नाही, किंवा तालुक्याच्या ठिकाणी कोणती मिटींग ही ठेवण्यात आली नाही. त्यामुळे संबंधीत शिक्षकांनी शाळेत रजेचा अर्ज ठेवून आणि पर्यायी शिक्षकाची व्यवस्था करुन शाळेतून जाणे योग्य आहे. परंतु तसे न करता शाळा सोडून जाणे हे चुकीचे आहे, असे ही त्यांनी म्हटले. दरम्यान स्वत:च्या मनमानी प्रमाणे वागणाऱ्या अशा शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.


 
Top