मुरूम(प्रतिनिधी)- माझ्या राज्यात माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे, यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना पराक्रमी राजा बनविण्यासाठीचे बाळकडू राजमाता जिजाऊ यांनी दिले. कर्तव्य, निष्ठा आणि शौर्य यांच्या जोरावरच समाजाला नवीन दिशा देता येते यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. तरुणांना जीवनाचे उद्दिष्ट कसे असावे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांनी दिली म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्हीही महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार सर्वांनी आत्मसात करून त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे तेवत ठेवावा असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने रविवारी (ता. 12) रोजी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश मोटे बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल पाटील होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक डी. डी. गव्हाणे, माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख भगत माळी, अजित चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरूळे, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड, अरविंद फुगटे, सुधीर चव्हाण, राहुल वाघ, बाळासाहेब भालकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मोहन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अंकुश शिंदे तर आभार सिद्धलिंग हिरेमठ यांनी मानले. यावेळी शहरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.