तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विवेकानंद सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, क्रीडा, निबंध इत्यादी स्पर्धा सुरू आहेत. याच दरम्यान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचा जन्म दिन हा ज्ञानशिदोरी म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके भेट म्हणून दिली जातात. याप्रसंगी प्रमुख उद्घाटक म्हणून सज्जनराव साळुंके, सदस्य, महाविद्यालय विकास समिती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन केले.
आपल्या मार्गदर्शन भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करुन पुस्तके वाचावीत, तुळजाभवानी महाविद्यालयाचा एक वेगळा इतिहास आहे,शिक्षक इमानदारीने त्यांचे काम करत असतात तसेच विद्यार्थ्यांचीही तेवढीच जबाबदारी असते. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या तुळजाभवानी महाविद्यालयाचे नाव मोठे करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांची देखील आहे असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी विशाल रोचकरी हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या कमी होणे ही चिंतेची बाब आहे. यामुळे शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे,पण वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत होणाऱ्या स्पर्धा या निश्चितच विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणाऱ्या आहेत. कारण विवेकानंद सप्ताहात विद्यार्थ्यांना एक मंच मिळतो. यातुन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा धनंजय लोंढे यांनी केले. तर अध्यक्षीय समापन श्री तुळजाभवानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य दौंड यांनी केले. ज्ञान शिदोरी कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रंथपाल दिपक निकाळजे यांच्या पुढाकाराने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनीय पुस्तके भेट स्वरुपात दिले. सदर प्रसंगी सह्याद्री ब्लड बँक धाराशिव यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर नवनिर्मीती प्रेरणा महिला मंडळ सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने तुळजाभवानी नेत्र रुग्णालय यांच्या मार्फत नेत्र तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. पुस्तके वाटप करुन वाचन संकल्पाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. विद्यार्थी जे पुस्तक वाचतील त्यांनी दोन दिवसानंतर वाचलेल्या पुस्तकांची समीक्षा देखील सादर करावयाच्या सूचना महाविद्यालयाकडुन देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाप्रसंगी मीना सोमाजी, डॉ.गीतांजली माने,सौ जयश्री जाधव,सौ संध्या खुरुद,सौ अरुणा कावरे,राधाताई घोगरे, यांच्या सह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ मंत्री आर आडे,प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर,प्रा अनिल नवत्रे,प्रा निलेश एकदंते, मोलाचे सहकार्य लाभले.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनाअभिष्टचिंतन पर मनोगत महाविद्यालयाच्या वतीने डॉ बापू पवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी केले. तर आभार प्रा श्रीमती ए.जी लकशेट्टी यांनी मानले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी भविष्यात महाविद्यालयाच्या नविन इमारत बांधकाम कामासाठी इंतभूत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.