तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे विवेकानंद सप्ताह, युवा सप्ताहाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध सिनेअभिनेते व तुळजाभवानी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शंतनु गंगणे यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की आपण ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतो त्याच महाविद्यालयात प्रमुख पाहुणा म्हणून येणे ही गोष्ट खुप सुखद असते, दिवसेंदिवस शिक्षण पध्दती बदलत चालली आहे. पण शिक्षकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये एका स्तरावर मैत्रीपूर्ण संबंध असणे ही गरजेचे आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेत न्यूनगंड असणार नाही. जीवनामध्ये हरवलेले क्षण परत कधीच येत नाहीत. आपल्याला एका वळणावर जीवनात योग्य तो निर्णय घ्यावाच लागतो. विद्यार्थी दशेत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन मी सिनेसृष्टीत 2006 साली आलो,पण एन सी सी मध्ये असुन देखील राष्ट्रपती महोदयासमोर परेड करण्याची संधी येऊन देखील तिथे जाता आले नाही. एन सी सी चा खूप अभिमान वाटायचा, तुळजापूर येथील पंचरंग प्रतिष्ठान मुळे देखील खूप मोठे योगदान मिळाले. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना वक्तृत्वावर प्रभुत्व असण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले महेंद्र कावरे, सहशिक्षक,माजी विद्यार्थी व अध्यक्ष , युवा स्पंदन सामाजिक संस्था तुळजापूर हे म्हणाले की, महाविद्यालयाने आमच्यासाठी खुप काही केले. शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचे आणि स्वामी विवेकानंदांचे विचारांशी बांधिल राहुन जीवनाचा प्रवास सुरू केला. प्रत्येक स्तराच्या वक्तृत्व स्पर्धा विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने सहभाग घेत गेलो आणि जिंकत गेलो. आपण स्वतःला संधी स्वतःच द्यावी लागेल म्हणजे स्वतःचे परीक्षण होईल. विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात अखंडीतपणे शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा त्या संधीसाठीच आहेत. वक्तृत्व कौशल्य वाढीसाठी वाचन संस्कृती वाढीस लागणे गरजेचे आहे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार या युवा महोत्सावाच्या निमित्ताने म्हणाले की, तुळजाभवानी महाविद्यालयाचे अंगण भविष्यात आणखीन गजबजून जाईल. कारण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संस्था या केवळ शाळा महाविद्यालये नसून त्या संस्कार केंद्र आहेत स्वामी विवेकानंदांनी देशाचा सांस्कृतिक पाया रचला आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांनी स्वराज्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रचला,भारताची, महाराष्ट्राची संस्कृती थोर व्यक्तीत्वांपासून घडत गेली, नैतिक अधिष्ठान हे मोबाईल किंवा तंत्रज्ञानावर आधारित नसून ते या महान व्यक्तींच्या विचारांमध्ये आहे आपण ही समजून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ मंत्री आर आडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा श्रीमती व्ही के बाबर यांनी केले. सदर प्रसंगी प्रा धनंजय लोंढे,प्रा डॉ.बापूराव पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा विवेकानंद चव्हाण,प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांच्या सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा श्रीमती के एस कदम यांनी मानले.