धाराशिव (प्रतिनिधी)- गो -आधारित जीवन पद्धतीकडे वळून मानवी जीवन आरोग्यदायी करता येते, ज्यामुळे रामराज्य येईल. रामराज्य आणायचे असेल तर गोसेवा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय सेवा कार्यप्रमुख उपेंद्र कुलकर्णी यांनी केले. ते धाराशिव इथे गो - विज्ञान संशोधन संस्था आणि दादरा नगर हवेली मुक्ती संग्राम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक ॲड. रवींद्र कदम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास विभागाचे अनिल व्यास अतुल अजमेरा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपेंद्र कुलकर्णी पुढे म्हणाले की, घरातलं वातावरण आरोग्यदायी राहावं यासाठी प्रत्येक घरात गोसेवा होण्याची गरज आहे. आनंददायी जीवन पद्धतीसाठी घराघरात गोमूत्र अर्क तसेच गायीच्या गोमूत्र आणि शेणा पासून तयार करण्यात आलेल्या विविध औषधी या वापरल्या गेल्या पाहिजेत. तरच गाईचे महत्त्व प्रत्येक घरापर्यंत पोहोचवता येईल असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात नागपूर इथल्या डॉक्टर प्रकाश रामभाऊ विटणकर यांना गोविज्ञान संशोधन संस्थेचा श्रद्धेय मोरोपंत पिंगळे गोसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 51 हजार रुपये रोख शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
तर सोलापूर इथल्या ज्ञानेश्वर मधुकर साठे यांना द्वितीय आणि धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळा येथील महेश जमाले, परंडा तालुक्यातील अंकुश नाळे, तुळजापूर तालुक्यातील धनाजी धोतरकर आणि उमरगा तालुक्यातील ओमप्रकाश घाटे यांनाही हे गोसेवा पुरस्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या पुरस्कारानंतर डॉक्टर प्रकाश विटणकर, ज्ञानेश्वर साठे यांनी आपल्या मनोगतामध्ये मोठ-मोठे आजार गायीच्या गोमुत्रामुळे संपून जातात असे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एड.रवींद्र कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील गोशाळा चालक तसेच सेंद्रिय शेतीवर आधारित शेती करणारे शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.