कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील उतमी (कायापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक तथा मांडवा ता. वाशी गावचे रहिवाशी  ऍड. महेबूब नवाब काझी यांनी दि 26 जानेवारी रोजी भाटशिरपुरा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत जाऊन शाळेला 11 हजार रुपये किंमतीचे एकूण 80 पुस्तके भेट दिली आहेत.

काझी यांनी 29 वर्षें प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली व सेवेत कार्यरत असतानाच एल. एल. बी. चे शिक्षण घेतले व पुढे वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी दि 25 जानेवारी रोजी स्वेइच्छा सेवानिवृत्ती घेऊन पुढे वकीली व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवानिवृत्ती बद्दल जिल्ह्यातील एका चांगल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्याच्या उद्देशाने काहीतरी भेट द्यावी म्हणून काझी यांनी भाटशिरपुरा शाळेची निवड करून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिनी शाळेला 11 हजार रुपये किंमतीचे विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडतील अशी एकूण 80 पुस्तके  भेट म्हणून भाटशिरपुरा शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांच्याकडे सुपूर्त केली. 

या प्रसंगी शाळेच्या वतीने श्री काझी यांचा सत्कार करण्यात आला. या बद्दल श्री काझी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी सरपंच सुनीता वाघमारे, उपसरपंच सूर्यकांत खापे, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, ग्रामसेवक सोनवणे, लोहटा पूर्व शाळेचे माजी मुख्याध्यापक अशोक कांबळे, भाटशिरपुरा शाळेतील शिक्षक श्रीकांत तांबारे, अमोल बाभळे सचिन तमाने, शहाजी बनसोडे, राजाभाऊ शिंदे, लिंबराज सुरवसे, प्रमोदिनी होळे, रंजना थोरात गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीकांत तांबारे यांनी केले. तर आभार अमोल बाभळे यांनी मानले.

 
Top