धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे कारखाना परिसरातील शिंदेवाडी, विठ्ठलवाडी गावांसह नदी काठावरील इतर गावच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कारण या पाण्यामुळे अनेक जलजन्य आजार उद्भवत असून नागरिक धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे या पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्यात दंग आहे. त्यामुळे याबाबत जर योग्य दखल घेतली नाही तर नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस गाळप करण्यासाठी विविध प्रकारच्या केमिकलचा वापर केला जातो. ते केमिकलयुक्त पाणी कारखान्यालगत असलेल्या शिंदेवाडी येथील ओढ्यात सोडले जाते. तो ओढा खापरवाडा नदीस मिळतो. तेच पाणी शिंदेवाडी व विठ्ठलवाडी नदी भोवतालच्या विहिरी व बोरमध्ये पाझरत आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाईलाजास्तव तेच पाझरलेले, दूषित व विषारी पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे हेच केमिकलयुक्त दूषित काळेकुट्ट पाणी या नदीवाटे विठ्ठलवाडी, बेंबळी मार्गे माकणी येथील निम्न तेरणा धरणामध्ये जाते.
बोअरवेलमध्येही दुषित पाणी
विठ्ठलवाडीस पाणी पुरवठा करण्यासाठी खापरवाडा या नदी पात्रामध्ये बोअर व 50 फूट विहीर खोदून मोटार टाकून पाईपलाईन व पाण्याच्या टाकीसाठी 40 लाख रुपये खर्च केलेले आहेत. मात्र गावकऱ्यांना या नदीतील पाण्याचा एक घोट देखील पिता येत नाही. पिण्याऐवजी ते सांडपाण्यासाठी वापरले जाते. विशेष म्हणजे याच नदी पात्रामध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत 6 - 7 रिचार्ज शाफ्ट देखील केलेले आहेत. या रिचार्ज शाफ्टमध्ये हेच केमिकलयुक्त व काळे कुळकुळीत मुरले जात आहे. त्यामुळे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी सरपंच श्रीहरी शिवलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामहरी कस्पटे, परमेश्वर शिवलकर व शरद लांडगे यांनी दिला आहे.