धाराशिव (प्रतिनिधी)-भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषा रोजगाराच्या संधी या विषयावर डॉ. केदार काळवणे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी त्यांनी वरील उद्गार काढले. पुढे मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन केले. 

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्था माता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते यांचा भाषा संचालनालय व महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ शाल व ग्रंथ भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला , त्यानंतर प्रास्ताविकातून मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांनी या कार्यक्रमाची नेमकी रूपरेषा विद्यार्थ्यांसमोर मांडली. 

मराठी भाषेतील रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? या विषयाला पुढे व्यक्त करताना केदार काळवणे यांनी मराठी भाषेतून वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली तर जाहिरात क्षेत्र,अनुभव आणि आकाशवाणी ,दूरदर्शन संहिता लेखन,चित्रपट लेखन अशा विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील.कोणतेही ध्येय सिद्ध करायचे असेल तर सातत्य असणे नितांत गरजेचे आहे ,असेही त्यांनी सांगितले.मराठी लेखन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड वाव असून त्यांनी या क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावले पाहिजे असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना या क्षेत्रात घडायचे असेल तर त्यांनी वाचन ,लेखन व भाषण ही त्रिसूत्री सांभाळून आपल्या अभिव्यक्तीला सतत प्रवाही ठेवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष समारोपातून प्राचार्य जयसिंगराव देशमुख यांनी मराठी भाषा संवर्धनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपुढे मराठी भाषेतील वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी जाणणे नितांत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या निमित्ताने भाषा संचालनालयाने जो उपक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. असेच विद्यार्थ्याभिमुख उपक्रम भाषा संचालनालयाने यापुढेही राबवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी वाचन लेखन आणि भाषण या त्रिसूत्रीचा अंगीकार करून आपल्या आयुष्याला आकार द्यावा असेही सांगितले. केवळ नोकरीच्या पाठीमागे न धावता मराठी भाषेतील या विविध रोजगारांच्या संधी आत्मसात करून त्या मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. या प्रसंगी भाषा संचालनालयाच्या विभागीय कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथील लक्ष्मण जाधव हेही उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ.वैशाली बोबडे यांनी करून दिला तर आभार प्रा. माधव उगिले यांनी मानले 'कार्यक्रमाला शहरातील साहित्यिक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top