धाराशिव (प्रतिनिधी)- आत्तापर्यंत नोंदणी केलेल्या एकूण शेतकरी बांधवांपैकी केवळ 21 टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राहिलेल्या 79 टक्के शेतकऱ्यांचे 31/01/2025 इतक्या कमी कालावधीत खरेदी करणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी यासाठी आपण राज्य सरकारकडे आग्रह केला आहे. राज्यसरकारही याबाबत सकारात्मक असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आलेले नाही. नोंदणीकृत शेतकऱ्यांची एकूण संख्या आणि बाजारात भाव मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्राकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल पाहता, अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करत होतो व केंद्र सरकारने 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली असली तरी नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याने मुदतीत सर्व नोंदणीकृत मालाची खरेदी करणे अशक्य वाटत असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.
धाराशिव जिल्हा आणि परिसरात खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून सोयाबीनला बहुतांश शेतकऱ्यांची पसंती आहे. त्यामुळे यंदाच्या खरिप हंगामात 4 लाख 62 हजार 872 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीनला रास्त हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात 21 हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सुरुवातीला हवामानातील बदलामुळे अपेक्षित आर्द्रता नसल्याने शेतकरी बांधवांना हमीभाव केंद्रावर सोयाबीन घालण्यासाठी विलंब झाला. मागील आठवडाभरापासून बहुतांश खरेदी केंद्रांना बारदाण्याची चणचण भासत होती. परिणामी काही केंद्रांवरील खरेदी प्रक्रिया यामुळे ठप्प पडली होती. पाठपुराव्यानंतर बारदाना उपलब्ध झाला आणि खरेदी पूर्ववत सुरू झाली. सोयाबीनला सध्या खुल्या बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव यंदा मोठ्या संख्येने शासकीय खरेदीकडे वळले आहेत.
जिल्ह्यात 35 हजार 403 शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे नोंदणी केलेली आहे. त्यापैकी 18 हजार 209 शेतकऱ्यांना खरेदी केंद्राकडून मेसेज पाठवण्यात आले आहेत. आणि त्यातील 7 हजार 639 शेतकऱ्यांच्या 1 लाख 97 हजार 194 क्विंटल सोयाबीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या संख्येच्या तुलनेत खरेदी झालेली संख्या केवळ 21 टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत राहिलेल्या नोंदणीकृत शेतकरी बांधवांच्या सोयाबीन 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी प्रक्रिया निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे खरेदीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळावी याकरिता आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.