तुळजापूर (प्रतिनिधी) सर्वोत्तम ग्राहकाभिमूख सेवा देण्यासाठी वीजबिलांची शंभर टक्के वसुली होणे महत्वाचे आहे. त्यासाठी थकबाकीमुक्त गावे निर्माण करून जिथे शंभर टक्के वसुली तिथे शंभर टक्के ग्राहकसेवा उपक्रम राबवा तसेच विविध योजनांची कामे वेगाने करा, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) अरविंद भादिकर यांनी दिले.
तुळजापुर येथे शुक्रवारी (24 जानेवारी) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, लातूरचे अधीक्षक अभियंता मदन सांगळे,बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत, धाराशिवचे अधीक्षक अभियंता संजय आडे. इन्फ्राचे अधीक्षक अभियंता अनिल काळे यांच्यासह परिमंडल कार्यालयातील विभागप्रमुख, सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, व्यवस्थापक (वित्त व लेखा) उपस्थित होते.
यावेळी वीजबील वसूलीसह विविध विषयांचा मंडलनिहाय आढावा घेताना संचालक भादिकर म्हणाले की, वीजबील वसुलीसह वितरण हानी 14 टक्कयापर्यंत कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. यासाठी वीजचोरीला आळा घालण्यासाठी नियमित ग्राहक मीटर तपासणी मोहीम, वीजचोरी असलेल्या भागात कोटेड कंडक्टरचा वापर, ग्राहकांना विनाविलंब वीजजोडणी, ग्राहकांच्या विविध तक्रारींचा तातडीने निपटारा यांना प्राधान्य द्यावे असेही ते म्हणाले. घरगुती ग्राहकांसोबतच व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांकडील चालू देयकासह थकबाकी वसुलीस प्राधान्य देत संपुर्ण कार्यक्षमतेने वीजबिल वसुलीसाठी व्यापक प्रयत्न करावेत. विशिष्ट वाहिनीचा किंवा भागाचा वीजपुरवठा किती वेळा खंडित झाला याची माहिती थेट वरिष्ठ कार्यालयाला उपलब्ध होणार असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार कमीत कमी कसे होतील, याकडे सर्व अभियंत्यांनी लक्ष द्यावे असे निर्देश देत शंभर टक्के कार्यक्षमतेने सर्वांनी काम करावे अन्यथा कटू कारवाईला सामोरे जावे असा इशाराही संचालक भादीकर यांनी दिला.